दरवाजा, कडीकोयंडा नाही, स्वच्छतेचा अभाव
मनपाचे सार्वजनिक शौचालय ‘सताड उघडे’
शहरातील पीरबाजार भागात महानगरपालिकेचे सार्वजनिक शौचालय आहे. उस्मानपुरा, एकनाथ नगर,फुले नगर या स्लम भागातील नागरिक याठिकाणी येतात. गेली अनेक वर्षे याची दुरावस्था झालेली पाहायला मिळत आहे मात्र मनपाने याकडे पूर्णपणे डोळेझाक केली आहे.तुटलेले सताड उघडे दरवाजे ,स्वच्छतेचा अभाव, तुंबलेले ड्रेनेज आणि कडीकोयंडा देखील नाही यामुळे याची दुरावस्था झालेली आहे. 4 वर्षांपूर्वीच हे शौचालय पाडून नवे बांधण्याची घोषणा करण्यात आली होती मात्र अजूनपर्यंत याची दखल मनपाने घेतलेली नाही.
पीरबाजार भागात महानगरपालिकेचे 30 ते 35 वर्षे जुने सार्वजनिक शौचालय आहे. मात्र गेली काही वर्षे देखभाल आणि दुरुस्तीकडे लक्ष न दिल्याने आज याची अतिशय दुर्दशा झाल्याचे पाहायला मिळत आहे. याठिकाणीच राणी बाई चंडालिया राहतात. स्वच्छतेचे काम करणार्या या महिलेने सांजवार्ता प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले, याठिकाणी दरवाजे नाहीत वर्षाआड दरवाजे बसवले जातात मात्र ते हलक्या प्रतिचे जुने असल्याने तसेच नागरिकांच्या अयोग्य वापरामुळे लवकर खराब होतात.इतर गोष्टींची दुरावस्था देखील यामुळेच झाली आहे.
चार वर्षांपूर्वीची घोषणा फक्त कागदावर
4 वर्षांपूर्वी शहरात नवीन शौचालये बांधण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत प्रशासनाकडून ठेवण्यात आला होता. त्यावेळी सार्वजनिक शौचालयाच्या दुरुस्ती संदर्भात पाच दिवसांत सुविधा देण्याचे आश्वासन तत्कालीन मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिले होते. नवीन शौचालय बांधण्यासंदर्भात लायन्स क्लब औरंगाबाद सेंट्रलने यात पुढाकार घेऊन शहरातील पीरबाजार येथील सार्वजनिक शौचालय पाडून तेथे नवीन शौचालय बांधण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.
4 वर्षांपूर्वी मनपाच्या सर्वसाधारण सभेत आम्ही शौचालयांबाबत प्रश्न उपस्थित केला होता.त्यावेळी पैठण गेट येथे महिलांकरीता वेगळे शौचालय बांधण्याचा निर्णय झाला होता. भूमिपूजन होऊन काम सुरु झाले मात्र त्यापुढे हे काम गेलेच नाही. तसेच पीरबाजार येथील सार्वजनिक शौचालयात जाऊन पाहणी केली असता तेथील दुरावस्था देखील प्रशासनाच्या नजरेस आणून दिली होती.नवीन शौचालयांसाठी घोषणा झाल्या मात्र आज 4-5 वर्षांनंतरही परिस्थिती जैसे थे आहे. उद्या आयुक्ताची भेट घेणार आहे त्यावेळी हा मुद्दा पुन्हा उपस्थित करेल.
- अॅड. माधुरी अदवंत -देशमुख,
माजी नगरसेविका